Wednesday, June 30, 2010

राज फडकवणार युरोपात झेंडा

महाराष्ट्रात मराठीचा लढा उभारणारे राज ठाकरे आता सातासमुद्रापारच्या मराठी तितुका मिळवण्यासाठी थेट युरोप गाठणार आहेत. येत्या २३ ते २५ जुलै दरम्यान स्वित्झर्लंड येथे होणा-या युरोपीय मराठी संमेलनाचे उद्धाटन त्यांच्या हस्ते होईल.

युरोपमध्ये राहणा-या मराठी माणसांना एकत्र आणणे आणि युरोपात वाढणा-या नव्या पिढीला मराठी संस्कृतीची ओळख व्हावी, यासाठी हा सोहळा आयोजित कऱण्यात आला आहे. चार दिवस चालणा-या या संमेलनात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम होतील.

या संमेलनाला क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कुष्ठरोगींची निस्वार्थ सेवा करणारे डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे, संगीतकार अशोक पत्की, गझलकार भीमराव पांचाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दिलीप प्रभावळकर, प्रशांत दामले, सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे यांच्यासारखे कलाकारही तेथे आपली कला सादर करतील.

संमेलनाच्या उद्घाटनानंतर निकिता मोघे यांनी दिग्दर्शित केलेला महाराष्ट्राच्या महानायिका हा कार्यक्रम होईल. यात शर्वरी जमेनिस, भार्गवी चिरमुले, सोनाली कुलकर्णी, मानसी नाईक आदी नायिका नृत्य सादर करतील.

संमेलनात सुनील गावस्कर, आमटे पती-पत्नी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. सचिन खेडेकर आणि डॉ. महेश पटवर्धन या मुलाखती घेणार आहेत. डॉ. चंद्रशेखर फणसळकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘ वाह गुरू ’ या नाटकाचा पहिला आंतरराष्ट्रीय प्रयोग संमेलनातच होणार आहे. यात ज्येष्ठ कलाकार दिलीप प्रभावळकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

अशोक पत्की यांची संगीत मैफल आणि भीमराळ पांचाळ यांच्या गझलांचा कार्यक्रम देखिल संमेलानमध्ये होणार आहे. प्रशांत दामले आणि मकरंद अनासपुरे ‘ गाठ आहे सत्याशी ’ हा नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. या प्रमुख कार्यक्रमांसह युरोपचे मराठमोळे वाद्यवृंद एक विशेष कार्यक्रम सादर करणार आहे. तसेच डॉ. निनाद ठाकरे ‘ लग्नानंतर काय ?’ हा काऊन्सिलिंगचा कार्यक्रम करणार आहेत.

या व्यतिरिक्त कीर्तन, सहल आदी उपक्रमही या संमेलनांतर्गत होतील. तसेच या सोहळ्यासाठी खास मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. त्यामुळे सातासमुद्रापार गेलेल्या अनेक जणांना अस्सल मराठी चव चाखता येईल.
........................

संमेलनासंदर्भात अधिक माहितीसाठी www.ems2010.org या वेबसाइटला भेट द्या.
संमेलनाच्या प्रायोजकत्वासाठी संपर्क - राजन बांदेकर ( मोबाइल - 98200 80827 , ईमेल- rbconsultants@mtnl.net.in )

No comments: